मुंबई - रहिवाशांकडून थकबाकी वसूल करणाऱ्या म्हाडाकडूनच ( MHADA ) थकबाकी वसूल करण्याची वेळ महानगरपालिकेवर आलेली आहे. वांद्रे पूर्वेकडील एमआयजी क्लब लगत असलेल्या समाज मंदिर सभागृहाचा मालमत्ता कर ( Property of Samaj Mandir Hall ) म्हाडाने थकविला आहे. म्हाडाने 2012 पासून मालमत्ता कर न भरल्याने ही रक्कम 1 कोटी 60 लाख 86 हजार 476 रुपयांवर पोचली असून ही रक्कम न भरल्यास सभागृहाचा लिलाव करण्याचा इशारा महापालिकेने ( Municipal Corporation ) दिला आहे.
सभागृह भाड्याने देऊन त्यामधून येणाऱ्या पैशातून थकबाकी भरण्याचा म्हाडाचा मानस होता. मात्र यामध्येही राजकारण आडवे आल्याने या रक्कमेचा भार म्हाडाला सोसावा लागणार आहे. वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणी हे म्हाडाचे मालकीचे समाज मंदिर सभागृह आहे. हे सभागृह खासगी कार्यक्रमासाठी देण्यात येते यातून उत्पन्नही मिळत होते. काही वर्षांपूर्वी या सभागृहाचा पुनर्विकास देखील करण्यात आला आहे. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना मात्र एका राजकीय व्यक्तीच्या नातेवाईकाने येथे जेवण बनविण्यास विरोध केला आहे. त्यानुसार म्हाडातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने तोंडी सूचना दिल्याने हे सभागृह कार्यक्रमांसाठी देणे बंद केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
म्हाडाने 1 सप्टेंबर 2012 ते 31 मार्च 2021 या कालावधीतील मालमत्ता कर महापालिकेकडे भरलेला नाही. ही रक्कम तातडीने भरावी अन्यथा या एमएमसी कायदा 1888 च्या कलम 206 नुसार या सभागृहाचा जाहीर लिलाव काढण्यात येईल, असा इशारा महापालिकेने म्हाडाला दिला आहे. माझ्याकडे पालिकेने नोटीस पाठवली आहे, याबाबत मला माहिती नाही. या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे मुंबई मंडळाचे सह मुख्य अधिकारी जीवन गलांडे यांनी सांगितले.
हेही वाचा - Ancient Kolhapur Temple Reconstruction : शेकडो वर्षे जुन्या या मंदिराचे का काढले जात आहेत संगमरवर...