मुंबई - म्हाडामार्फत कोकण मंडळातर्फे ८ हजार २०५ घरांची सोडत येत्या ऑक्टोबर अखेरीस निघणार आहे. २३ ऑगस्टपासून अर्ज विक्रीला सुरुवात होईल. ठाणे, मीरा रोड, विरार, कल्याण आणि सिंधुदुर्ग भागात ही घरे बांधण्यात येणार आहेत, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच मुंबईतील घरांसाठी आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही आव्हाड म्हणाले.
हेही वाचा - म्हाडाचे मुंबई मंडळ घर सोडतीच्या तयारीत
१४ ऑक्टोबरला सोडत
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे ही मोहीम राज्यात सर्वत्र राबवली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे या घरांची सोडत पुढे ढकलण्यात आली होती. लवकरच सर्वसामान्यांची स्वप्न साकार करणाऱ्या घरांची लॉटरी म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे काढली जाणार आहे. यंदाच्या वर्षी ६, ५०० घरे ही प्रधानमंत्री आवास योजना, दोन हजार घरे ही मंडळाची तर पाचशे घरे इतर काही प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून समाविष्ट केली आहेत. १४ ऑक्टोबरला या घरांची सोडत निघेल. एकूण सदनिकांपैकी ७५ टक्के सदनिका अत्यल्प गटासाठी तर २२ टक्के सदनिका या अल्प गटासाठी असतील, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
येत्या दोन वर्षात बांधण्याचे नियोजन
कल्याणमधील शिरढोण, खोणी, ठाण्यातील भंडार्ली, गोठेघर, मीरा रोड, विरारमधील बोळींज येथे सदनिका उपलब्ध करून दिल्या जातील. अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५ हजार, अल्प उत्पन्न गटाकरिता १० हजार, मध्यम उत्पन्न गटाकरिता १५ हजार आणि उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, असेही आव्हाड म्हणाले. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर जिल्ह्यातही सुमारे १० हजार घरे येत्या दोन वर्षात बांधण्याचे नियोजन म्हाडाने आखले आहे. पुण्याच्या धर्तीवर ही घरे बांधण्यात येणार आहेत. लोकांचा म्हाडावर दृढ विश्वास असल्याचे आव्हाड म्हणाले.
हेही वाचा - सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; दसऱ्याला म्हाडाची नऊ हजार घरांची सोडत
कोणत्या विभागात किती घरे?
मीरा रोड येथे मध्यम वर्गीयांसाठी २ बीएचके १९६ घरे आहेत. ठाण्यातील वर्तकनगरमध्ये ६७ दुकाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यांची किंमत जवळपास ३८ लाख ते ४० लाखांच्या आसपास असेल. कोकण मंडळाच्या लॉटरीनुसार, वडवली येथे २०, कासारवडवली ३५० घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून या घरांची किंमत १६ लाखांच्या जवळपास असेल. ठाण्यातील वर्तक नगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी ६७ घरे असणार आहेत. या घरांचे क्षेत्रफळ ३२० चौरस फूट असून या घराची किंमत ३८ ते ४० लाखांच्या आसपास असेल. विरार येथे १ हजार ३०० घरे उपलब्ध असतील. यात एक हजार घरे अल्प आणि बाकीची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले.