मुंबई - प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा (Pradhan Mantri Pik Vima Yojana ) लाभ मिळत नाही. केंद्राच्या या योजनेच्या भोंगळ कारभारावरुन विधानपरिषदेत सदस्यांनी ( Member of legislative Council ) आज जोरदार टीका केली. कृषी मंत्र्यांनी देखील कंपन्यांवर ( Pik Vima Yojana Company ) कारवाई करण्यास केंद्राच्या नियमांचा अडथळा येतो, अशी खंत व्यक्त केली. सभापतींनी यावर तोडगा काढण्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठक बोलवावी, अशी सूचना केली. त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी संबंधित तक्रारीसंदर्भात विमा कंपन्यासोबत चर्चा करू, असे ग्वाही दिली.
विमा कंपन्यांकडून आडकाठी -
पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी मॅकेनिझम तयार करणार का, असा तारांकित प्रश्न विधानपरिषदेत सदस्य प्रशांत परिचारक ( Prashant Paricharak ) यांनी उपस्थित केला. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा बोजवारा उडाला आहे. मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते, असा गंभीर मुद्दा परिषदेत मांडला. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी विमा कंपन्यांनी अपात्र ठरवलेल्या अधिकाऱ्यांवर दिरंगाई केल्याप्रकरणी कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला. तर कोणत्याही एका जिल्ह्यापुरता विषय मर्यादित नाही. ज्या कंपन्यांनी विमा देण्यास आडकाठी करत आहे. त्या सर्वांसोबत बैठक लावून सरसकट तक्रारींचा खुलासा करुन तोडगा काढावा, अशी सूचना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.
विमा कंपन्यांसोबत बैठक घेऊ -
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्यासंदर्भात हवामान धोक्यांमध्ये सुधारणा करुन सुधारित हवामान धोक्यांनुसार योजनेची अंमलबजावणी केली जाईल. मंडळस्तरावर बसविण्यात आलेली पर्जन्यमापक यंत्रे गावपातळीवर बसविण्याचा विचार सुरु आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचे दावे नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याबाबत विमा कंपन्यांकडून आढावा घेतला जाईल. सोलापूर जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये मृग बहार आणि आंबिया बहार हवामान आधारित फळपीक विमा योजनेत ( Weather Based Fruit Crop Insurance Plan) 38 हजार 561 अर्ज आले होते. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मात्र विमा कंपन्यांनी नामंजूर केलेल्या अर्जाबाबत आढावा घेतला जाईल असेही कृषिमंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. तसेच सोलापूर जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये मृग बहार व आंबिया बहारसाठी शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेतला. योजनेच्या निकषांनुसार मृग बहार 2020 मध्ये पात्र शेतकऱ्यांना 57 लाख 16 हजार रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाईपोटी अदा करण्यात आली तर आंबिया बहार 2020-21 मध्ये सोलापूर जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांना 3 कोटी 29 लाख रुपये इतकी विमा नुकसानभरपाई देण्यात आली, अशी माहिती भुसे यांनी दिली.