मुंबई - सोशल मीडियावर पोलिसांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची भेट घेऊन भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात होत असलेल्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पोलिसांनी पक्षपात न करता कारवाई करण्याची मागणी केली.
लॉकडाऊन काळात राज्यातील परिस्थितीबाबत भाजपा कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. मात्र, अशा भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात सरकारकडून जाणूनबुजून कारवाई केली जात असल्याने सोशल मीडियावर पोलिसांची दुटप्पी भूमिका स्पष्ट दिसत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
सोशल मीडियावर उघडपणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एन्काऊंटरची धमकी देण्यात आली. त्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. कोरोनाच्या युद्धात अशा प्रकारच्या घटनांनी पोलिसांचे मनोबल खचत असून यासाठी पोलीस महासंचालकांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केली.