मुंबई - मागील आठवड्यात मंगळवारी वरळी बीडीडी चाळीत सिलेंडर स्फोट ( Worli BDD Chawl Cylinder Blast ) होऊन एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू ( Three People Died ) झाला आहे. या कुटूंबातील ५ वर्षाचा एकटा मुलगा वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलाची जबाबदारी मी स्वत: आणि शिवसेनेने घेतली आहे. यापुढे मी आणि शिवसेना या बाळाची पालक असले, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांनी दिली आहे.
महापौरांकडून विचारपूस
मागील आठवड्यात मंगळवारी वरळीच्या बीडीडी चाळीत सिलेंडर स्फोट झाला होता. यात पुरी कुटूंबीय जखमी झाले. त्यांच्यावर नायर रुग्णालयात वेळीच उपचार न झाल्याने त्याचे पडसाद उमटले आहे. या प्रकरणी २ डॉक्टर आणि एका नर्सला निलंबित करण्यात आले. या प्रकरणी नायर रुग्णालयातील उप अधिष्ठाता यांची तसेच थर्ड पार्टी चौकशी केली जात आहे. या दुर्घटनेतील एकटा ५ वर्षीय मुलगा जिवंत असून तो कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहे. या मुलाचा ४ महिन्याचा लहान भाऊ, २७ वर्षीय वडील आणि २५ वर्षीय आईचा मृत्यू झाला आहे. या मूलाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापौरांनी आज कस्तुरबा रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, या मुलाची जबाबदारी आपण स्वत: आणि शिवसेनेने घेतल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.
'हे बाळ आम्ही दत्तक घेतलं'
या प्रकरणावरून भाजपाकडून शिवसेना आणि महापौरांवर आरोप केले जात आहेत. त्याबाबत बोलताना ही दुर्घटना झाली तेव्हा आरोप करणाऱ्यांपैकी कोणी अॅम्ब्युलन्स तरी पाठवली का? असा प्रश्न उपस्थित करून त्यावेळी शिवसैनिक, कार्यकर्ते सुरुवातीला मदतीला धावले, जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पोद्दारला उपचार होणे शक्य नव्हते. म्हणून नायरला नेले. त्याठिकाणी उपचाराला उशीर झाला असंवेदनशिलता दिसली त्यामुळे २ डॉक्टर आणि एका नर्सला तातडीनं निलंबीत केले. या दुर्घटनेतील मुलाचे वडील नायर हॉस्पिचलमध्येच क्रिटीकल कंडीशनमध्ये होते. आई ५६ टक्के भाजली होती. जे बाळ वाचलंय त्याची प्रकृती स्थिर आहे. सिद्धीविवायकाला, मुंबादेवीला, दर्ग्यात, सर्व धर्मियांच्या देवस्थांनात प्रार्थना करते हे बाळ वाचु दे. शिवसेना या अनाथ बालकाची आई-बाप होईल. हे बाळ आम्ही दत्तक घेतले आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. गॅस सिलींडर आता बंद होऊन धोका कमी असलेल्या पाईप गॅसचा अवलंब जास्तीत जास्त होईल, अशा योजना आणाव्यात अशी मागणी महापौरांनी केली आहे.