मुंबई - राणीबागेत पेंग्विन ( Mumbai Rani Baug Penguin ) आणल्याने शिवसेना युवा नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भाजपाकडून नेहमीच युवराज आणि पेंग्विन संबोधले जाते. मग गुजरात अहमदाबाद येथील सायन्स सिटीमध्येही पेंग्विन आणल्याने भाजपा नेते आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांना 'गुजरात पेंग्विन' म्हणायचे का असा टोला महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar on Ashish Shelar ) यांनी लगावला आहे. मुंबईच्या पेंग्विनपेक्षा गुजरातचे पेंग्विन पाहणे आणि त्यावरील खर्च अधिक आहे. तरीही भाजप नेते आमच्यावरच गळा काढतात असे महापौरांनी म्हटले आहे.
- 'गुजरात पेंग्विन' म्हणायचं का -
मुंबईच्या राणीबागेत २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ८ हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यामधील एका पेंग्विनचा त्याच वेळी मृत्यू झाला. पेंग्विनची देखभाल करण्यासाठी १५ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. यावरून भाजपाने पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करून टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुजरातच्या अहमदाबादमधील सायन्स सिटीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्याठिकाणी झालेला खर्च, पर्यटकांकडून घेतले जाणारे शुल्क आदींची माहिती घेऊन आज पत्रकार परिषद घेत भाजपाच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी बोलताना गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर आमचे आदरातिथ्य उत्तम होते. सर्वांनी आमचा आदर केला. गुजरातचे महापौर अगदीच साधे आणि सरळ आहेत, त्यांनी जिलेबी फाफडा दिला आणि म्हटले जिलेबी फाफडा, किशोरीबेन आपडा. इकडे मात्र त्याच्या विरोधात सर्व सुरु आहे. मी गुजरातला अमहदाबादला गेले काही बोलले नव्हते पण काही लोकांना उलट्या झाल्या, मुंबईला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे म्हणून आज बोलत आहे. आम्ही स्वखर्चाने गेलो. मला मुक्या प्राण्यावर बोलायचं नव्हतं पण राजकारण केलं जात असल्याने बोलावं लागत असल्याचे महापौर म्हणाल्या. मुंबईत पेंग्विन आणल्याने भाजपावाले आदित्य ठाकरे यांना युवराज आणि पेंग्विन संबोधत आहेत. आता गुजरात अहमदाबादमध्येही पेंग्विन आणले आहेत. मग भाजपा नेते आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांना 'गुजरात पेंग्विन' म्हणायचं का असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
- गुजरातमध्ये प्रत्येक प्राणी पाहायला वेगळे शुल्क -
गुजरातमध्ये सायन्स सिटी उभारण्यासाठी २६४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यात पेंग्विन कक्ष वेगळा आहे. त्यात सहा पेंग्विन आणल्याची माहिती आहे पण आता फक्त पाच पेंग्विन आहेत. एक पेंग्विन कुठे गेला हे सांगितलं जात नाही. गुजरातमध्ये २०० रुपये किमान शुल्क आहे. प्रत्येक प्राणी पहायला वेगवेगळे शुल्क आकारले जाते.प्रत्येक सेक्शनला वेगळा आकार आहे. गुजरात मधील सायन्स सिटीत प्रत्येक ठिकाणी पैसे घेतले जातात. तिथे बस पैशानं आणि उठ पैशानं अशी परिस्थिती असल्याचे महापौर म्हणाल्या.
- राणीबाग गुजरातच्या सायन्ससिटी पेक्षा स्वस्त -
मुंबई राणीबागेत २५ ते ५० रुपये शुल्क घेऊन संपूर्ण राणीबागेत फिरता येते. लहान शाळेतील मुलाना ५० रुपये घेतले जातात. त्यात सर्व प्राणी पहाता येतात. मुंबईत राणीबागेत दिव्यांग, सिनीयर सिटीझन यांना मोफत प्रवेश आहे.गुजरातमध्ये अशी मोफत सुविधा कुणालाही नाही. राणीबागेत २४ तास तज्ञ डॉक्टर कर्मचारी असतात. गुजरातमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम नाही. गुजरातमधील पेंग्विन कक्षात जे डॉक्टर आहेत ते देखिल मुंबईतूनच आपल्याकडचा अनुभव घेऊन तिकडे गेले आहेत. गुजरात मधील पेंग्विन कक्ष उभारण्याकरता मुंबईचीच मदत घेतली गेली असे महापौरांनी सांगितले. गुजरातच्या सायन्स सिटीपेक्षा मुंबईची राणीबाग स्वस्त आहे. आम्ही इथे पैसे वाढवले तर हे लगेच गळा काढतील असा टोला महापौरांनी भाजपाला लगावला.
- शेलार आणि भाजपाला आव्हान -
गुजरातच्या सायन्स सिटी मुंबईच्या राणीबागेपेक्षा महाग आहे. त्यानंतरही मुंबईत आम्ही काही चांगलं करायला गेलो, की पैसे वाढवले, भ्रष्टाचार केला असे भाजपचे काही लोक म्हणतात. पेंग्विन मुद्द्यावर आशिष शेलार यांच्यासमोर वन टू वन चर्चा करा असे भाजपचे लोक मला उपदेश देतात. आशिष शेलार माझ्याबद्दल जे काही बोलले आहेत त्याबद्दल त्यांनी आधी सर्व महिलांची मागावी असे आव्हान शेलार आणि भाजपाला दिले.
हेही वाचा - Viral Video Of Accident : 'त्या'अपघातापूर्वीचा व्हायरल व्हिडिओ आला समोर