मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून गेल्या काही दशकात सलग दुसऱ्या वेळी कोणत्याही पक्षाचा खासदार निवडून आलेला नाही. आज झालेल्या मतमोजणीत भाजपच्या मनोज कोटक यांनी विजय संपादन करत हा इतिहास बदलला आहे.
ईशान्य मुंबई म्हणजेच उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातून १९७७ आणि १९८०च्या निवडणुकांमध्ये सलग २ वेळा सुब्रह्मण्यम स्वामी इथून निवडून आले होते. मात्र, त्यानंतर कोणत्याही खासदाराला इथून सलग निवडणूक जिंकता आलेली नाही. या मतदार संघातील मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत खासदार बदलल्याने कोणत्याही एका पक्षाचा खासदार या ठिकाणी पुन्हा निवडून आलेला नाही. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आरोप केल्याने सेनेच्या विरोधामुळे सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली.
कोटक यांना विजयी करण्यासाठी पक्षाकडून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, मंत्री पंकजा मुंडे, महादेव जानकर आदी दिग्गजांना प्रचारासाठी आणण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून कोटक यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवली. २४ व्या शेवटच्या फेरीनंतर कोटक यांना ५ लाख १४ हजार ५९९ मते मिळाली, राष्ट्रवादीचे संजय पाटील यांना २ लाख ८८ हजार ११३ तर, वंचित बहुजन आघाडीच्या निहारिका खोंदले यांना ६८ हजार २४९ मते मिळाली. कोटक यांनी पाटील यांचा २ लाख २६ हजार ४८६ मतांनी पराभव केला.