मुंबई - दारूमधून गुंगीचे औषध पाजून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कारादरम्यान संबंधित महिलेची अश्लील चित्रफीत बनवून काही महिन्यांनापासून हा आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता.
एका कार कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारा शाम मस्के हा आरोपी कार डिलिंगच्या संदर्भात शहरातील एका व्यापाऱ्याच्या संपर्कात होता. कामा निमित्त आरोपीचे व्यापाऱ्याच्या घरी येणे-जाणे होते. या दरम्यान व्यापाऱ्याच्या पत्नीशी ओळख झाल्याने त्याने तिच्याशी मैत्री करून अधून मधून भेटण्यास सुरुवात केली. यानंतर एका हॉटेलमध्ये दारुच्या ग्लासात गुंगीचे औषध देऊन आरोपीने महिलेवर बलात्कार केला.
गेल्या काही महिन्यांपासून पीडित महिलेने आरोपीशी संपर्क तोडल्यावर शाम मस्के याने महिलेला गाठून मोबाईल मधील तिचा अश्लील व्हिडिओ व फोटो दाखवून धमकविण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने हा प्रकार पतीला सांगितल्यावर पीडितेच्या पतीने माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी शाम मस्के याला अटक केली आहे.