मुंबई - मागील सात दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजप नेते आमदार आशिष शेलार आझाद मैदानात पोहोचले. व त्यांनी एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देत राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे मायावी सरकार एसटी कामगारांच्या कामाची प्रशंसा एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या एसटी कामगारांचा संपाचा आजचा सातवा दिवस आहे. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी या संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आझाद मैदान येथे हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. सामान्य माणसाची सेवा करणारा जर कुठला एक वर्ग असेल तर तो माझा एसटी कर्मचारी आहे. आपल्या घरामध्ये सुख दुःखाचा दिवस असेल त्याची पर्वा न करता तो इतरांच्या सेवेसाठी कामावर रुजू होतो अशा ड्रायव्हरला माझा सलाम असे सांगत आशिष शेलार यांनी एसटी कामगारांच्या कामाची प्रशंसा केली. हा लढा कामगारांच्या हितासाठीच नाही तर त्यांच्या वर्गाला न्याय देण्यासाठी आहे, असे शेलार म्हणाले. दोन ओळींचा जीआर काढण्यासाठी इतका वेळ का ?
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमची ओळख व्हायला पाहिजे ही साधी मागणी एसटी कामगारांची आहे. म्हणून एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी सरकारला एक वाक्याचा साधा जीआर काढायची गरज असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आताचे सरकार हे मायावी सरकार आहे. मायावी राक्षसाप्रमाणे हे सरकार वागत आहे. साध्या शब्दांमध्ये सामान्य माणसाला बनवण्याचं काम हे सरकार करत आहे. शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं पण आता काय झालं ? हे बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात दुसऱ्याबरोबर, यांचे दाखवायचे दात दुसरे आणि खायचे दात दुसरे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. एसटी कामगारांच्या साध्या मागणीवर विचार करायला सरकारला इतका वेळ का लागतो? आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराष्ट्राची सेवा करणारा एसटी कामगार असतो व या कामगाराचा मला गर्व आहे असंही अशिष शेलार यांनी सांगितलं आहे. हेही वाचा - Naxals killed in Gadchiroli : पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 26 नक्षलवाद्यांचा खात्मा, चार पोलीस जखमी