मुंबई - विदेशातील ओमिक्रॉनच्या विषाणूचा (Omicron Variant) संसर्ग झपाट्याने पसरतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती गोळा करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on New Corona Variant) यांनी यावेळी दिले. तसेच नियमित प्रवाशांची माहिती मिळाल्यास संसर्ग रोखू शकतो, असा आशावादही व्यक्त केला. दरम्यान, गर्दीचे कार्यक्रम रोखण्यासाठी क्रिसमस पार्टी, थर्टी फर्स्टसाठी नवे नियम लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तर १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सची चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
विलगीकरण, आरटीपीसीआर बंधनकारक -
फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये ओमायक्रॉन प्रादुर्भाव वाढतो आहे. या देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याने तेथील लाट सर्वात मोठी आहे. दररोज ३० हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधित आहेत. ओमिक्रॉन विषाणूचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने १२ देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली आहे. राज्यात उतरल्यावर पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच सात दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना -
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार, हा सध्याचा प्रश्न आहे. पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत केले जावे, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यासाठी कामाला लागावे, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.
ख्रिसमस, थर्टी फर्स्ट पार्टीवर निर्बंध -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. विदेशात दिवसागणिक ओमिक्रॉन (Omicron Variant) या घातक विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आधीच खबरदारी घेतली आहे. राज्यात रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमासाठी नवी नियमावली तयार केली जाणार आहे. ख्रिसमस, थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर देखील निर्बंध लावण्यात येणार आहेत. या संदर्भातील नवी नियमावली लवकरच जाहीर होणार आहे.
शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम -
येत्या १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत ही आरोग्य विभागाने चाईल्ड टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे १ तारखेला सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.