मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत येतात. यावेळी ते विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात. यंदा कोरोना विषाणूचे संकट असल्याने ५ ते ७ डिसेंबर दरम्यान 'ग्लोबल पॅगोडा' बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका व ‘ग्लोबल पॅगोडा’च्या प्रतिनिधीनी संयुक्तपणे दिली आहे. पॅगोडा बंद असल्याने याठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी येऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या ठिकाणी दिल्या जातात भेटी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत येतात. दादर चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांना अभिवादन करतात. त्यानंतर राजगृह, इंदू मिल, आंबेडकर भवन, आंबेडकर कॉलेज, सिद्धार्थ वसतिगृह, सिद्धार्थ कॉलेज, परेल येथील बाबासाहेबांचे घर, ग्लोबल पॅगोडा आदी ठिकाणी भेट देतात.
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमीत न येता ऑनलाईन अभिवादन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.
पॅगोडा बंद -
गोराई मढ येथे असलेल्या 'ग्लोबल पॅगोडा' येथेही आंबेडकर अनुयायी भेट देत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२०दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, अनुयायांनी दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२०दरम्यान ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये. तसेच कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ-७) विश्वास शंकरवार व ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.
पालिकेच्या बैठकीत निर्णय -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ‘आर-मध्य’ विभाग कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध संघटनांचा समावेश होता. या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तीन दिवशी ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी अनुयायांनी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे प्रत्यक्ष न येता. आपापल्या घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा- बुलडाण्याच्या बालसुधारगृहात दोन मुलांची गळफास घेवून आत्महत्या
हेही वाचा- कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी बाजार समिती संचालकांनी दिला आंदोलनाचा इशारा