मुंबई - सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने ( Mahanagar Gas Increased Rate ) ग्राहकांना पुन्हा एकदा दरवाढीचा झटका दिला आहे. आजपासून (दि. 8 जानेवारी) मुंबईत सीएनजीच्या ( Compressed Natural Gas ) दरात प्रति किलो अडीच रुपयांची तर पीएनजीच्या ( Pipe Natural Gas ) दरात प्रती एससीएम ( Standard Cubic Meter ) दीड रुपयांची वाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांत एमजीएलने सीएनजी व पीएनजी दरात आतापर्यंत चारवेळा वाढ केलेली आहे. त्यामुळे आता महागाईची झळ मुंबईकरांना बसणार आहे.
चार महिन्यात सहावेळा किमती वाढ -
केंद्र शासनाने नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ केल्यानंतर एमजीएलकडून सातत्याने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली जात आहे. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ते आतापर्यंत एमजीएलने ( Mahanagar Gas Limited ) सीएनजी व पीएनजी दरात आतापर्यत सहावेळा वाढ केलेली आहे. एमजीएलने 8 जानेवारी म्हणजे आजपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो अडीच रुपयांची, तर पीएनजीच्या दरात प्रती एससीएम दीड रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती पाईप गॅस वापरकर्त्यांसह रिक्षा-टॅक्सी आणि सीएनजी वाहन चालकांना आर्थिक फटका बसणार आहे.
असे वाढले दर -
नव्या दरवाढीमुळे मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलो 63.50 रुपयांवरून 66 रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच पीएनजीचे दर 38 रुपयांवरून 39.50 रुपये प्रति एससीएम झाले आहेत. या दरवाढीमुळे अवघ्या तीन महिन्यांत सीएनजी दरात प्रति किलो 13.43 तर पीएनजी दरात प्रति एससीएम 8.83 रुपयांचा भडका उडाला आहे.
मुंबईत 'अशी' झाली दरवाढ
दिनांक | सीनएजीचे दर (प्रति किलोग्रॅम) | पीएनजीचे दर (प्रति एससीएम) |
3 ऑक्टोबर | 52.57 रुपये | 30.67 रुपये |
4 ऑक्टोबर | 54.57 | 32.67 |
13 ऑक्टोबर | 57.54 | 33.93 |
27 नोव्हेंबर | 61.50 | 36.50 |
17 डिसेंबर | 63.50 | 38 |
8 जानेवारी | 66 | 96.50 |
हेही वाचा - सीएसएमटी-कुर्ला स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना निनावी फोन; आरोपीला जबलपूर येथून अटक