मुंबई - मुंबईत सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेतील राजकारण चांगलंच वाढत चालल आहे. भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. त्यातच आता भाजपने मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलल्याचे हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना कचाट्यात सापडली आहे. हे झालं राजकीय. पण मुंबईकरांच्या आयुष्यावर धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा खरच काही परिणाम होतो का? हे जाणून घेण्याचा ईटीव्ही भारतने प्रयत्न केला.
प्रत्येक धर्म प्रदूषण करतो - याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही मागील 20 वर्षांपासून अधिक काळ आवाज फाउंडेशनच्या माध्यमातून ध्वनिप्रदूषण नियंत्रणावर काम करणाऱ्या सुमेअरा अब्दूलअली यांच्याशी संपर्क साधला. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, "आपल्या देशात प्रत्येक धर्म कोणत्या ना कोणत्या मार्गाने ध्वनी प्रदूषण करतच असतो. ज्याप्रमाणे मशिदींवर भोंगे असतात त्याप्रमाणे त्याप्रमाणे मंदिरात देखील स्पीकर लावलेले असतात. अगदी गुरुद्वारात देखील हीच परिस्थिती असते. त्यामुळे सर्वच धार्मिक स्थळांवर काहिनाकाही प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतच असते. कोणताही धर्म हे प्रदूषण कमी करण्याचे स्वतःहून ठरवत नाही ते दुसऱ्यांवर ढकलत असतात."
भोंगे किती प्रदूषण करतात ? - "धार्मिक स्थळांवरील या प्रदूषणात मशिदींवरील भोंग्यांमुळे नेमके किती प्रदूषण होते याची अद्यापही ठोस आकडेवारी नाही. त्या संदर्भात अशा प्रकारचा कोणताही रिसर्च देखील झालेला नाही ही. हा पण एवढं नक्की आहे की मशिदींवरून सकाळी 6 वाजता जो भोंग्यांचा वापर केला जातो त्याला परवानगी नाही. अर्थात फक्त माशीदच नाही तर कोणालाही रात्री साडेदहा ते सकाळी 6 पर्यंत कोणत्याही प्रकारचे स्पीकर लावण्याचा, भोंगे लावण्याचा कोणताही अधिकार नाही. तो कायद्याने गुन्हा आहे." सुमेअरा अब्दूलअली यांनी सांगितलं.