मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळावा, लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी १०० टक्के लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारती आणि कार्यालयांवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' म्हणजे, पूर्णपणे कोरोनाची लस घेतलेली इमारत, असा फलक लावण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने 'अर्ली टेस्ट, ट्रीटमेंट, डिस्चार्ज' ही त्रिसूत्री राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
'फुल्ली वॅक्सिनेटेड' लोगो
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला आहे. अजूनही काही झोपडपट्टयातील रहिवाशांमध्ये लसीकरणाचे महत्व समजलेले नाही. अनेकांकडून लसीचे डोस घेण्यास टाळाटाळ केली जात असून याचे प्रमाण झोपडपट्यांमध्ये अधिक असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी इमारतीमध्ये राहणाऱ्या अथवा काम करणाऱ्या अशा सर्वांचे लसीकरण झालेले असेल अशा इमारतीच्या प्रवेशद्वारावर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा लोगो लावण्यात येणार आहे. इमारतीमधील सर्व पात्र व्यक्तींचे दोन्हीही कोरोना लसीचे डोस झालेले असणे आवश्यक आहे. या लोगोमुळे ज्यांनी अद्याप लसीकरण केलेले नाही, किंवा लसीकरणासाठी ज्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते, अशा व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा मुंबई महानगरपालिकेला आहे. संबंधित इमारतीतून कोरोना प्रसाराचा धोका कमी असल्याची माहिती मिळण्यास मदत होईल, असे प्रशासनाला वाटत आहे.
'अर्ली टेस्ट, ट्रीटमेंट, डिस्चार्ज' त्रिसूत्री
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यामुळे मुंबई महापालिकेने अर्ली टेस्ट, ट्रीटमेंट, डिस्चार्ज या त्रिसूत्रीवर जोर दिला आहे. सध्या मुंबईत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. या पार्श्वर्भूमीवर या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गणेशोत्सव पार पडला असून उत्सवासाठी गावी गेलेले नागरिक पुन्हा मुंबईत परतणार आहेत. त्यांच्यामाध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याची काळजी महापालिका घेत आहे. महापालिकेने २६६ चाचणी केंद्र सुरू केली आहेत. अर्ली टेस्ट, ट्रीटमेंट, डिस्चार्ज या त्रिसूत्रीनुसार लक्षणे दिसण्याआधीच चाचण्या करण्यावर भर दिला आहे. त्यानंतर बाधिताला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. या त्रिसूत्रीमुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये अथवा कोरोना झाल्याने त्वरित उपचार मिळावा म्हणून भर देण्यात येणार आहे.
हेही वाचा - माझ्याकडे मोकळा वेळ नाही, मी भला माझी कामे भली - अजित पवार