मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र असले तरी १५ जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे वाढते रुग्ण आहेत. तेथे रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. म्हणजे राज्यात कोरोनाची दुसरी लाट अजूनही असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेतही त्यांनी दिले. राज्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळा
कोरोना संसर्गितांचे बारकाव्याने निरीक्षण करा, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवा. मात्र, होम क्वारंटाईन करू नका, अशा सूचना देण्यात आल्याचे थोरात यांनी सांगितले. कोरोना संख्या वाढत असलेल्या १५ जिल्ह्यांचाही थोरात त्यांनी आढावा घेतला. येथील लोकांना पोलीस महासंचालकांनी सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार अधिक होत असून तेथे आता खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
ग्रामीण भागात ग्राम रक्षक दल
आता खरीप हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे कामानिमित्त शेतकरी एकमेकांच्या संपर्कात येण्याच्या अधिक शक्यता आहेत. त्यातूनही हा संसर्ग अधिक फैलावण्याची शक्यता आहे. अशावेळी मुंबई मॉडेलप्रमाणे काम करण्याची आवश्यकता आहे. रुग्णवाढ होत असलेल्या १५ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लग्न समारंभांना अधिक गर्दी झाली. आणि त्याचा परिणाम दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ होण्यात झाला. प्रशासन आपले काम करत आहे. पण नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. मुंबईतील सोसायट्यांचा पदाधिकाऱ्यांना विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागात ग्राम रक्षक दल तयार करण्यात यावे. त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. म्हणजे ते नागरिकांना सूचना देतील आणि नागरिकही त्यांचे ऐकतील. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीला आळा बसेल, असे थोरात म्हणाले. पुढील आठवड्यात पुन्हा त्या १५ जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.