मुंबई - उपनगरीय रेल्वेचा प्रवास करताना प्रवाशांना रेल्वे तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवरील लांब रांगेचा सामना करावा लागत होता. मात्र, आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या एटीव्हीएम मशीनवर एक अनोखी सुविधा दिली आहे. आता प्रवाशांना आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेल्या फोन-पे, गुगल-पे आणि पेटीएम सारख्या युपीआय पेमेंटद्वारे तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना स्मार्टकार्ड काढण्याची गरज नाही. थेट एटीव्हीएम मशीनद्वारे प्रवाशांना युपीआय पेमेंट करून तिकीट मिळवता येणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बंद पडणाऱ्या एटीव्हीएम मशीनला संजीवनी - तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, तसेच प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने २०१४ मध्ये रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएम मशीन सुरु केल्या होत्या. मात्र एटीव्हीएम स्मार्ट कार्डचा वापर करण्याची संख्या फार अल्प असल्याने या एटीव्हीएम मशीनला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने यावर उपाय म्हणून एटीव्हीएम मशीनवर तिकीट काढून देण्यासाठी निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. सुरुवातील यांना एटीव्हीएम मशिनच्या स्मार्टकार्डमधून तिकीट विक्रीसाठी ५ टक्के कमिशन देण्यात आले होते. रेल्वेच्या या संकल्पनेला रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. सोबतच रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील भार सुद्धा कमी झाला होता. मात्र, १ एप्रिल २०१८ पासून रेल्वे बोर्डाने यांच्या कमिशनमधून २ टक्क्यांची कपात केली आहे. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवृत्त कर्मचारी एटीव्हीएम मशिनवर बसण्यास टाळाटाळ करत असल्याने एटीव्हीएम मशिन बंद पडण्याच्या मार्गावर आल्या होत्या. एटीव्हीएम मशीनद्वारे प्रवाशांना डिजिटल पेमेंट सुविधा सुरु केल्याने एटीव्हीएम मशिनला संजीवनी मिळाली आहे.
युपीआय अॅपच्या मदतीने मिळणार तिकीट - वाढती ऑनलाईन सेवा पाहता रेल्वेनेही प्रवाशांना ही सुविधा दिली आहे. प्रवाशांना एटीव्हीएम मशीनवर क्यूआर कोड फ्लॅश होताना दिसेल, त्यानंतर तुम्हाला तो स्कॅन करावा लागेल. तुम्ही कोणत्याही युपीआय अॅपच्या मदतीने लोकल ट्रेनच्या तिकिटांसाठी पैसे देऊ शकता. यापूर्वी रेल्वेकडून स्मार्ट कार्ड जारी केले जात होते. हे एटीव्हीएममध्ये तिकीट किंवा पास खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकत होते. पण आता रेल्वेने सुरू केलेल्या नव्या सुविधेनंतर प्रवाशांना युपीआयद्वारे ट्रेनचे तिकीट खरेदी करता येणार आहे. कांदिवलीमध्ये राहणाऱ्या राज पवार या प्रवाशांने ईटीव्ही भारतला याबाबत माहिती दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पूर्वी रेल्वेचे एटीव्हीएम मशीनमधून तिकीट काढण्यासाठी आम्हाला स्मार्ट कार्ड काढावे लागत होते. मात्र, आता रेल्वेने युपीआय पेमेंट सुविधा सुरु केल्याने थेट मोबाईलमधील युपीआय अॅपच्या, माध्यमातून तिकीट काढता येत आहे. रेल्वेची ही सुविधा फार छान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.