मुंबई - अवकाळी पावसामुळे हार्बर मार्गावर ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड आल्याने काही कालावधीसाठी हार्बर सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे हार्बर मार्गावर धावणाऱ्या सर्व लोकल सेवा खोळंबल्याने लोकल प्रवाशांना घरी पोहोचण्यात उशीर झाला.
हार्बर मार्गावरील प्रवाशाचे हाल -
गुरुवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या जोरदार वारा आणि अवकाळी पावसामुळे हर्बल मार्गावरील मानसरोवर येथील रेल्वेच्या ओव्हर हेड व्हायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे डाऊन मार्गावरील हार्बर सेवा विस्कळीत झाली होती. ही घटना रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी घडली. त्यामुळे परतीचा प्रवास करणाऱ्यांचे मोठे हाल झाले. लोकल प्रवाशांना तब्बल एक घंटा ताटकळत लोकलमध्ये बसून राहावे लागले.
हार्बर मार्गावरील वेळापत्रक कोलमडले -
हार्बर मार्गावर 8 वाजून 10 मिनिटांनी मानसरोवर दरम्यान ओव्हर हेड व्हायरमध्ये बिघाड झाला होता. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिक पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंदतर ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ध्या तासासाठी हार्बर मार्गावरील डाऊन लोकल सेवा विलंबाने धावत होती, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मात्र, लोकल सेवेचा खोळंबा झाल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले.
हेही वाचा - भोकरदन तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान