मुंबई - लोहमार्ग पोलिसांनी वसई-पनवेल लोहमार्गावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १ हजार ४९८ विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याची किंमत २ लाख ८६ हजार रुपये आहे. पोलिसांनी ही कारवाई त्रिवेंद्रम वेरावल एक्स्प्रेसमध्ये केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.
१ हजार ४९८ बाटल्या जप्त -
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०६३३४ त्रिवेंद्रम वेरावल एक्स्प्रेसमध्ये तीन व्यक्ती गोवा येथून विदेशी दारु विकत घेऊन गुजरात येथे विकण्यासाठी घेवून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही गाडी पनवेल स्थानकात आली असता पोलिसांनी गाडीत चढून तपास मोहिम सुरु केली. पनवेल ते वसई रोड स्थानकादरम्यान पोलिसांना तीन संशयित व्यक्ती आढळल्या. त्यांची लोहमार्ग पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांच्या जवळून एकूण १ हजार ४९८ बाटल्या सापडल्या. या अवैद्य मद्याची किंमत २ लाख ८६ हजार रुपये आहे.
तिन्ही आरोपी अहमदाबादमधील -
पोलिसांनी गोवा येथून गुजरातला एक्स्प्रेसमधून पाठविण्यात येणारा हा अवैद्य मद्यसाठा लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला. तसेच भावेश परागजीभाई पटेल, संजय गुलाबभाई वंजारा आणि मनीष नरेंद्रभाई सोनावणे या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी अहमदाबादमध्ये राहणारे आहे. ही दारु गोवा राज्यातून खरेदी करून गुजरात राज्यात ठिकठिकाणी विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या तपासात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षण गजेंद्र पाटील, सहा पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पो. हवालदार महेश सुर्वे, शौकत मुजावर, पोलीस नाईक हितेश नाईक, राकेश भामरे, लक्ष्मण वळकुंडे, सुरेश येल्ला, सत्यजीत कांबळे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा - Tokyo Olympics : रवी दहियानं जिंकलं रौप्य पदक, भारताला पाचवे पदक