मुंबई - देशात सगळीकडे उन्हासह महागाईच्या झळा जनता सोसते ( Inflation soared in india ) आहे. मागील काही दिवसात महागाई वाढतच चालली आहे. कधी पेट्रोलचे दर वाढतायत ( Petrol Price Hike ), तर कधी सीएनजीचे, कधी डाळींचे दर वाढत आहेत, तर कधी खाद्य तेलाच्या किमती झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, या भाववाढीच्या स्पर्धेत आता लिंब देखील मागे राहिलेली नाहीत. कारण, सध्या मार्केटमध्ये दहा ते बारा रुपये प्रमाणे एक लिंबू मिळत ( Lemon Price Hike in market ) आहे.
आवक घटली - "मार्केट व्यवस्थित असताना दादर मार्केटमध्ये साधारण दररोज दहा ते बारा लिंबाचे टेम्पो येतात. मात्र, आता लिंबूच कमी असल्याने हे प्रमाण चार आणि पाच टेम्पोवर आले आहे. मागील काही दिवसाच्या तुलनेत अर्धेच लिंबू बाजारात ये आहेत. यावरूनच तुम्ही विचार करा मालाची किती शॉर्टेज आहे", असे व्यापारी अमोल यांनी सांगितले.
काय आहेत कारणं ? लिंबाच्या या भाव वाढीमागे नेमकी काय कारण आहेत? हे जाणून घेण्यासाठी आम्ही दादरच्या भाजी मार्केट मधील लिंबाचे घाऊक व्यापारी अमोल सरडे यांच्याशी संपर्क साधला. यासंदर्भात माहिती देताना अमोल म्हणाले की, "आपल्या महाराष्ट्रात लिंबांचे चांगले उत्पादन होते आणि आपल्याकडच्या लिंबांना सर्वत्र मागणी असते. मात्र, मध्यंतरीच्या काळात आपल्याकडे लिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. त्याच वेळी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणी लिंबाची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यावेळी महाराष्ट्रातील लिंबू त्या साईडला मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आली. त्यामुळे सध्या आपल्याकडे लिंबांचा पुरवठा कमी आहे, त्याचा परिणाम म्हणून लिंबाच्या किमती वाढल्या आहेत."
120 ते 200 रुपये किलो लिंबू - "मागची वीस ते पंचवीस वर्ष मी हा व्यवसाय करतोय. मात्र, इतक्या वर्षात लिंबांचा एवढा दर आम्ही देखील पाहिलेला नाही. लिंबाचा दर जास्तीत जास्त शंभर रुपये किलोपर्यंत जात होते. मात्र, आता तेच दर एकशे वीस दोनशे रुपये किलो पर्यंत आहेत. जी सर्वात छोटी लिंब असतात ती लिंब सध्या चारशे रुपये शेकडा प्रमाणे विकली जात आहेत. चारशे रुपये शेकडा म्हणजेच चार रुपयाला काचेच्या गोटिच्या आकाराचे लिंबू." पुढे बोलताना अमोल यांनी सांगितले.
यावर उपाय काय ? - या दर वाढीवर काही तोडगा आहे का? असा प्रश्न अमोल यांना विचारला असता ते सांगतात की, "सध्या यावर तोडगा म्हणून आपल्याकडे इतर राज्यातून लिंब मागवली जात आहेत. मात्र ती लिंब हिरवी म्हणजे कच्चे असताना तोडली जातात. आपल्याकडे येईपर्यंत ती पिवळी होतात. पण, त्याची कॉलिटी ही घसरलेली असते. त्या लिंबाची साल जाड असते त्यात रस देखील कमी असतो. त्यामुळे लिंबाचं पुढचं पीक येईपर्यंत वाट बघण्याशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय नाही."
हेही वाचा - Petrol Price Hike - आजही पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ, 'हे' आहेत नवे दर