मुंबई - कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालयात एका रुग्णाचे बिल सतरा लाख दहा हजार रुपये आल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गंभीर दखल घेत रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. यानंतर त्यांनी अवाजवी बिल आकारल्याचे सिद्ध केले. अखेर उपरती झालेल्या प्रशासनानं त्या रुग्णाचे बिल कमी केले. खासगी रुग्णालयात लूट सुरू असून ती थांबवण्याचे आवाहन दरेकर यांनी केले आहे.
मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या लुटमारी संदर्भात दोन दिवसांत महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊ, असे दरेकरांनी सांगितले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.
अवास्तव बिल आकारले जात आहे. खासगी रुग्णालयाची कार्यपद्धती यातून उघडकीस आलीय. एका महिन्याचे बिल १७ लाख १० हजार आकारण्यात आले. यांसदर्भात आपण आणि मंगल प्रभात लोढा येथे येणार आहे कळल्यानंतर हे बिल १३ लाखांपर्यंत कमी करण्यात आले. या १३ लाखांच्या बिलाची विभागवारी मागितल्यानंतर २ लाख रुपये फक्त पीपीई किटचे दाखवण्यात आले आहेत. साधारणतः एका पीपीई किटला २७०० रुपये आकारले आहेत. त्याची बाजारात ३०० रुपये किंमत आहे. ४०० ते ५०० रुपये इंजेक्शनसाठी आकारले आहेत. पण ८२ वर्षांचा रुग्ण आहे. त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स कार्यान्वित होऊ शकतात का, हाही एक प्रश्न उपस्थित होतो. दीड ते २ लाखांचे बिल हे १७-१८ लाख रुपयांवर जाते यापेक्षा गोरगरिबांची लूट काय असू शकते, असा प्रश्न दरेकरांनी उपस्थित केला. अशाप्रकारचे भयानक वास्तव कोहिनूर रुग्णालयाच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. फायर ब्रिगेडमधून सेवानिवृत्त झालेले हे रुग्ण ज्यांनी आपले सर्व आयुष्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी खर्ची घातले, त्यांचा जीव वाचू शकला नाहीच, उलट सतरा - अठरा लाखांचे बिल आले. यासारखा सेवेचा आणि सर्वसामान्य जनतेचा अपमान काय असू शकतो, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.
'ना पोलिसांचे नियंत्रण, ना सरकारचे नियंत्रण'
या लुटीवर महापालिकेचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. फक्त बेड द्यायचे. पण वैद्यकीय साहित्य, औषधे कितीला खरेदी करायचे यावर ना पोलिसांचे नियंत्रण, ना सरकारचे नियंत्रण. त्यामुळे आम्ही ५० बेड आरक्षित केले, म्हणजे आम्ही गरिबांसाठी काहीतरी केले, या महापालिकेच्या दाव्याला काही अर्थ नाही. कारण बेड ज्या कमी किंमतीला ठरुवून दिले आहेत, त्याची अधिकची वसुली विविध पद्धतीच्या औषधांच्या किंमतीच्या माध्यमातून होत आहे. असे हे विदारक चित्र उघड झाले आहे. म्हणजे २ लाखाची पीपीई किट लागणे म्हणजे एका रुग्णाला दिवसातून ३ वेळा पीपीई किट घालून तपासणे असा अर्थ होतो. पण एक पीपीई किट घालून एक डॉक्टर एकावेळी २५ ते ५० रुग्णांना तपासू शकतो. अशाप्रकारे पळवाट काढून सर्वसामान्य रुग्णांची लूट खासगी रुग्णालयांकडून होत आहे. हे भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही,असे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.