मुंबई - महापालिकेच्या बोरिवली येथील भूखंडावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारीत लेझर पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह देशासाठी योगदान देणाऱ्या सर्वच राष्ट्रीय नेत्यांचाही जीवनपट लेझर शोच्या माध्यमातून उलघडण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव आज पालिकेच्या सुधार समितीमध्ये मंजूर करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वीच भाजपने आरेसाठी वृक्ष तोडीचा प्रस्ताव मंजूर करून शिवसेनेला दुखावले होते. आज त्याचा वचपा काढत शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने अटल बिहारी वाजपेयी यांच्या उद्यानात सर्वच राष्ट्रीय नेत्यांचे माहितीपट उलगडणाऱ्या लेझर पार्कचा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे येत्या काळात शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बोरिवली शिंपोली येथील मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने म्हाडाच्या माध्यमातून लेझर पार्क बनवण्यात आले आहे. या भूखंडावर डेमोक्रेसी इमारत, एक्झिबिशन हॉल, संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, लायब्ररी आदी वास्तूंमधून अटलबिहारी वाजपेयी यांचा जीवनपट उलगडण्यात येणार आहे. हे लेझर पार्क ३० वर्षाच्या परिरक्षणासाठी चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन या संस्थेला दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सुधार समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. याप्रस्तावावर बोलताना लेखात पार्कच्या समितीवर दोन पालिकेचे अधिकारी घेतले जाणार आहेत त्याच प्रमाणे स्थानिक नगरसेवकालाही सदस्य म्हणून घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या रमाकांत रहाटे व अनंत नर यांनी केली. अनंत नर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचाही इतिहास या उद्यानातील लेझर शोच्या माध्यमातून उलघडावा, अशी मागणी केली तर काँग्रेसच्या अश्रफ आझमी यांनी देशासाठी योगदान दिलेल्या जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे आदी सर्वच नेत्यांचा लेझर शोमध्ये समावेश करावा अशी मागणी केली.
भाजपचा विरोध -
शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या मागणीला भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. हा पार्क अटलबिहारी यांच्या जीवनपटावर असल्याने त्यात इतर नेत्यांच्या समावेश नसावा, अशी मागणी भाजप सदस्यांनी केली. इतर नेत्यांसाठीही अशी उद्याने बनवावीत मात्र त्यांचा या उद्यानात समावेश करू नये, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी लावून धरली. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी समितीवर स्थानिक नगरसेवक असावा या उपसूचनेसह, काँग्रेसच्या अश्रफ आझमी यांच्या लेझर शोमध्ये सर्वच नेत्यांचा जीवनपट उलगडावा या मागणीसह प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी जाहीर केले. यामुळे आता या उद्यानात अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह सर्वच राष्ट्रीय नेत्यांचे जीवनपट उलगडले जाणार आहेत.