मुंबई - करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनचा माजी एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर क्षितिज रवी प्रसाद याला विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. बॉलिवूड ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी क्षितीज प्रसाद याचे नाव समोर आल्यानंतर एनसीबी कडून त्यास अटक करण्यात आली होती.
अॅड. सतिश माने शिंदे यांचे एनसीबी वर आरोप -
क्षितिज रवी प्रसाद याचे वकील सतीश माने शिंदे यांनी म्हटले आहे की, प्रसाद यास अटक केल्यानंतर त्यावर जोर जबरदस्ती करत करण जोहर , रणबीर कपूर, अर्जुन रामपाल व धर्मा प्रोडक्शनच्या इतर कर्मचाऱ्यांचे अमली पदार्थ तस्करी संदर्भात नाव घेण्यास दबाव टाकला होता. क्षितिज प्रसाद यास एका प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर आणखीन एका बोगस प्रकरणामध्ये एनसीबी कडून अटक दाखवण्यात आल्याचा आरोपही सतीश माने शिंदे यांनी केला आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये आगीसीलाओस डिमेट्रीवेज यास सुद्धा जमीन विशेष न्यायालय करून मंजूर करण्यात आलेला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन रामपाल याने एनसीबी चौकशीसाठी हजर होण्यासाठी 21 डिसेंबरची वेळ मागून घेतलेली आहे. मात्र, अर्जुन रामपालचा ठावठिकाणा कुठे आहे ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. अर्जुन रामपाल मुंबईत आहे की मुंबईच्या बाहेर आहे याबद्दलची माहिती एनसीबीला देण्यात आलेली नाही. अर्जुन रामपाल कडून आलेल्या विनंती बाबत एनसीबीने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.