मुंबई - कोरेगाव-भीमा प्रकरणातील जामीन याचिका फेटाळणाऱ्या विशेष एनआयए कोर्टाने दिलेल्या दोन आदेशांना आव्हान देत फादर स्टॅन स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्टॅन स्वामी यांच्या अपिलावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाब विचारला आहे.
मंगळवारी न्यायाधीश एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाळे यांच्या खंडपीठाने दोन्ही अपीलमध्ये नोटीस बजावली असून राज्य जेल अधिकाऱ्यांना स्वामींचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हा अहवाल 15 मे 2021 पर्यंत सादर करावा, असे ही कोर्टाने नमूद केले.
स्वामींच्या बाजूने ज्येष्ठ वकील मिहिर देसाई यांनी कोर्टाला सांगितले की, ऑक्टोजेनियन पार्किन्सन रोगाने फादर स्टेन स्वामी पीडित आहेत. तुरुंगातील कोविड प्रकरणात वाढ झाल्यामुळे स्वामींच्या प्रकृतीला गंभीर धोका असल्याची भीती उद्भवली असल्याचेही त्यांनी सांगितले. कोर्टाने याबाबत एनआयएला जाब विचारला असून तुंरुगातून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.
स्वामी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, २०१८ पासून त्यांची चौकशी सुरू असली तरी त्यांना २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी न देता त्यांना अटक झाल्यानंतर लगेच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्वामींनी असा दावा केला की, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे आणि अटकेमुळे त्याच्या सन्मान आणि आयुष्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. या प्रकरणात २०० हून अधिक साक्षीदार असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आणि लवकरच खटला सुरू होण्याची शक्यता नाही. सहआरोपी डॉ. वरवरा राव यांच्या खटल्यात त्यांना सहा महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्याच्या आदेशावरही त्यांनी संदर्भ देत भर दिला.