मुंबई - शहरातील पालिका रुग्णालयांमध्ये मागील काही दिवसांपासून मृत्यूंची संख्या वाढली आहे. या परिस्थितीला महानगरपालिका कारणीभूत आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी आज केईएम रुग्णालयात भेट दिली. मुंबईचा महापौरांना नीट नियोजन करता येत नसल्यास त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केईएम रुग्णालयात जाऊन अधिष्ठाता हेमंत देशमुख यांच्याशी संवाद साधला. यानंतर ही परिस्थिती सत्य असल्याचे त्यांनी मान्य केले. पालिकेकडून या बाबींचा पुरवठा लवकरात व्हायला हवा, अशी देखील इच्छा सोमय्या यांच्याशी व्यक्त केली. महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची कमी असण्याला पालिकेतील सत्ताधारी आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला. तसेच त्यांनी यावेळी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुंबई महानगरपालिका आम्ही ऑक्सिजनचे टँक जागोजागी उभारत आहोत. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा पुरेपूर होण्यासाठी नियोजन करत असल्याचे सांगत आहे. मात्र ऑक्सिजन अभावी रुग्णांना जीव गमवावा लागलाय. त्यामुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि महापौर ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात सांगत असलेली परिस्थिती खरी आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने अनेक निष्पाप सामान्य लोकांचे जीव जात आहेत. आणि याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचे सत्ताधारी आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.