मुंबई - शिवसेना नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजप नेते किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सोमैया आणि कुटुंबियांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या या आरोपांविरोधात सोमैया कुटुंबीयांनी आता मुलुंड पोलीस ठाण्यात मानहानीची तक्रार दिली असून, 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल' अशी प्रतिक्रिया किरीट सोमैया यांनी दिली आहे. ते मुलुंड पोलिस ठाण्याबाहेर पत्रकारांशी बोलत होते.
आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न - किरीट सोमैया सकाळी 11 वाजता काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पत्नी मेधा सोमैया व पुत्र निल सोमैया यांच्यासह मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सोमैया म्हणाले की, "मी महाविकास आघाडीतील नेत्यांचे आणि मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड करतोय आणि त्यामुळेच आमच्यावर दबाव आणण्यासाठी हे खोटे आरोप केले जात आहेत."
म्हणून तक्रार दाखल - 'महाविकास आघाडीचे अर्ध्याहून अधिक मंत्री आणि नेते भ्रष्टाचारात बुडाले आहेत. एवढ्यावरच न थांबता मी यांच्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे आणखी घोटाळे बाहेर काढणार आहे. म्हणून माझ्यावर दबाव आणण्यासाठी कुठला तरी टॉयलेट घोटाळा समोर आणून, माझ्या पत्नीवर खोटे आरोप केले जात आहेत. माझ्या कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण सुरू आहे. म्हणूनच मी माझ्या कुटुंबीयांसोबत संजय राऊतांविरोधात मानहानीची तक्रार दिली आहे.' अशी प्रतिक्रिया किरीट सोमैया यांनी दिली आहे.
'जास्त फडफडू नका' राऊतांचा इशारा - 'फक्त सोमैयाच नाही, तर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या भाजपच्या दोन आमदारांचा भ्रष्टाचार आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत. या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार किरीट सोमैया आहेत. जी लोकं स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसर्यांच्या घरावर दगड मारू नयेत. जास्त फडफडू नका सगळे पीस गळून पडतील.' असा थेट इशाराच संजय राऊत यांनी सोमैया यांना दिला आहे.
हेही वाचा : Rana Couple Fly to Delhi : राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना; आम्ही कोर्टाचा अवमान केला नाही - नवनीत राणा