मुंबई - साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. किरण नगरकर हे ७७ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
किरण नगरकर गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मराठीबरोबरच इंग्रजीतही साहित्य लिखाण केले होते. मराठीतील 'सात सक्कं त्रेचाळीस' आणि 'ककल्ड' ही कादंबरी प्रचंड गाजली. ते हिंदू लिटररी प्राइज, जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट आणि साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
किरण नगरकर यांचा जन्म २ एप्रिल १९४२ मध्ये मुंबईत झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाले. पुण्याचा फर्ग्यूसनमधून पदवी तर मुंबईच्या एसआयइएस कॉलेजमधून इंग्लिश विषयात पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. ते मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे कुटुंब ब्राम्हो समाजाची तत्वे मानणारे होते. किरण नगरकरांची पहिली कादंबरी इ.स. १९६७-६८ च्या सुमारास 'अभिरुची' मध्ये प्रसिद्ध झाली होती. नंतर तीच 'सात सक्कं त्रेचाळीस ' या नावाने मौज प्रकाशनाने इ.स. १९७४ साली प्रकाशित केली. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्यांमध्ये हिची गणना होते. त्यानंतर त्यांची 'रावण आणि एडी '(इ.स. १९९४) ही कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली होती. 'गॉड्स लिटल सोल्जर 'ही त्यांची केवळ इंग्रजीत प्रकाशित झालेली कादंबरी आहे. रावण अॅन्ड एडी व ककल्ड (इ.स. १९९७) या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले.
इ.स. २००१ साली ककल्ड या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मोजक्याच कादंबर्या लिहूनही ते लोकप्रिय झाले आहेत. याशिवाय 'कबीराचे काय करायचे? आणि 'बेडटाईम स्टोरी' ह्या दोन नाट्यकॄती त्यांच्या नावावर आहेत. 'स्प्लिट वाईड ओपन' ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनय ही केला आहे. अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जायचे.