मुंबई - मुंबईतील खार पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला 70 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी 80 हजाराची लाच मागितली होती. स्वप्निल बबनराव मासळकर असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
सहाय्यक पोलीस स्वप्निल मासळकर याच्या विरुद्ध खार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्या मालकीच्या इमारतीला मुंबई महानगर पालिकेकडून धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावली होती.
तक्रारदार यांनी इमारतीच्या आजूबाजूस लोखंडी पत्रे लावले आहेत. यामुळे इमारतीमधील दुकानदारांना दुकानामध्ये ये-जा करण्यासाठी अडचण होत असल्याची तक्रार दुकानदारांनी खार पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारी अर्जावरुन गुन्हा दाखल करण्यासाठी स्वप्निल मासळकर याने तक्रारदार यांच्याकडे 80 हजार रुपये लाच मागितली होती. मात्र तडजोडीची रक्कम म्हणून 70 हजार स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 28 मे रोजी याबाबत पडताळणी केली. त्यात आरोपी स्वप्निल मासळकर याने 70 हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले. त्यानुसार हा सापळा रचण्यात आला होता.