मुंबई - बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता दिग्दर्शक करण जोहर याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास पत्र लिहिले आहे. हे पत्र पाठवल्याची माहिती स्वतः करणनेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशासाठी प्राण वेचलेल्या वीरांचे धाडस, भारतीय म्हणून जपली जाणारी मूल्य आणि देशातील विविधतेतून एकता जपणारी संस्कृती यावर आधारित उत्तमोत्तम सिनेमे बनवणार असल्याचे आश्वसन त्याने या पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांना दिले आहे. तसेच यासाठी त्यांनी आपण आणि आपल्या सहकार्याने मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्याने केली आहे.
गतवर्षी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी खास सिनेमा तयार केला होता. तशाच काही कल्पना घेऊन अजून काही चांगल्या विषयावर सिनेमा बनवण्याची इच्छा करणने व्यक्त केली आहे.
या पत्राद्वारे आपण आणि आपले सहकारी वर्षभरात अनेक उत्तम विषयावर आधारित सिनेमे बनवून देशाची प्रतिमा उंच करण्याचा निश्चितच प्रयत्न करू असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
या पत्रावर अद्याप पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या निमित्ताने येणार वर्ष देशाची मान गर्वाने ताठ राहील असे अनेक सिनेमे पहायला मिळतील याची खात्री यानिमित्ताने करणने व्यक्त केली आहे.