मुंबई - जोगेश्वरी ते गांधीनगरकडे जाणाऱ्या जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यातच रस्त्यावर प्रचंड खड्डे आणि खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने या गंभीर समस्यांची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध करताच पालिकेने या मार्गावरील रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.
हेही वाचा - 'आता राज्य सरकारची लढाई वाढलीये'; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे मत
जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावरील पवई आयआयटी ते गांधीनगर एलबीएस मार्गाला जोडणारा संपूर्ण रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची बातमी ईटीव्ही भारत ने प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर महानगरपालिका खडबडून जागी झाली असून, अखेर या रस्ता दुरूस्तीचे काम पालिकेने सुरू केले आहे.
लॉकडाऊन काळात जेव्हीएलआर मार्गावर वाहनांची वर्दळ कमी असली तरी या मार्गावर खड्यांमुळे अपघातसत्र सुरूच होते. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. याबाबत पवईतील जनसेना संघटना आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते ज्वाली मोरे या दोघांनी पालिकेकडे वारंवार तक्रारी करत पाठपुरावा केला. मात्र, याची दखल घेण्यात आली नव्हती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत 'ईटीव्ही भारत' ने ४ जुलै रोजी बातमी प्रसिद्ध करताच पालिकेने तत्काळ या मार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पावसाची संततधार यामुळे रस्ता दुरुस्ती कामात अडथळे येत असून, लवकर आयआयटी मार्केट ते गांधी नगर मार्ग पुर्ववत करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.