मुंबई - एकीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजपा सोडत नसताना, आता आघाडीतल्या मंत्र्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गृहनिर्माण विभागाच्या बैठकी वरून वाद निर्माण झाला आहे. गृहनिर्माण मंत्र्यांना न विचारता उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हाडाची बैठक घेतल्याने गृहनिर्माण मंत्री आव्हाड नाराज झाले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत पडू शकतात पडसाद?
म्हाडाचे माजी सभापती आणि विद्यमान उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या तत्कालीन कार्यकाळात काही उर्वरित कामाच्या बाबतीत गृहनिर्माण अधिकाऱ्यांना विचारणा करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीची कल्पना मंत्री आव्हाड यांनी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांमध्ये वाद झाला असून त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत पडू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आव्हाड यांनी अद्याप उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली, तरी अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आव्हाड यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली आहे. तर दुसरीकडे म्हाडाच्या सभापती असताना काही कामे रखडली होती, यासंदर्भात केवळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असल्याचे सामंत यांचे म्हणणे आहे.
भाजपाची टीका
एकंदर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष भाजपाने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांचे अनेक मुद्यांवर मतभेद असल्याचे आधीच उघड झाले आहे. औरंगाबादचे नामांतर असो किंवा आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीबाबत तसेच इतर मागासवर्गीय आणि मराठा आरक्षणाबाबतीत ही मंत्र्यांची एक वाक्यात दिसून येत नाही. आता गृहनिर्माण बैठकीची भर पडली आहे.