मुंबई - ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करणार्या भाजपला 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे, अशा आशयाचे ट्वीट जयंत पाटील यांनी करत भाजप आंदोलनाची एकप्रकारे खिल्ली उडवली आहे.
असा आहे वाद
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राज्यातल्या ओबीसी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ठिकठिकाणी आंदोलने आणि मेळावे सुरू झाले. यामध्ये सरकारमधले आणि विरोधी पक्षांतले नेतेही सहभागी झाले आहेत. पण आता निवडणूक कार्यक्रमच जाहीर झाल्याने हा वाद आणखी पेटला आहे. निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. जानेवारी 2020 मध्ये एकूण 44 पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर 4 मार्च 2021 ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण रद्द केलं गेलं. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक ठरलेलं आरक्षण लगेच रद्द झाले.