मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे. याचबरोबर आर्थिक प्रकरणांबाबत ईडीकडून तपास सुरू आहे. त्यातच आता अमली पदार्थांच्या सिंडिकेटबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे दिल्लीतील पथक मुंबईत येऊन तपास करत आहे. अद्याप सीबीआयच्या हाती कुठलीही गोष्ट लागली नसताना यांचा संबंध रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्तीसोबत असल्याचा खुलासा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात येत आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेला जैद याने एनसीबी चौकशीदरम्यान शोविक यास अमली पदार्थ पुरवल्याचे कबूल केले आहे. सुशांतसिंह याच्या मृत्यूनंतरही जुलै महिन्यात सॅम्युअल मिरांडा यास अमली पदार्थ दिल्याची कबुली जैद याने दिली आहे. यासाठी त्यास सॅम्युअल याने जे पैसे दिले होते, ते शोविक चक्रवर्तीने पाठवले असल्याचे जैद याने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
जैद हा सॅम्युअल मिरांडा याच्याकडून अमली पदार्थांच्या बदल्यात रोख रकमेत पैसे घेऊन अमली पदार्थांचा पुरवठा करत होता. मात्र, हे अमली पदार्थ तो अब्दुल बसितकडून घेत असल्यामुळे त्याला त्याचा मोबदला गुगल पे वरून करत होता. दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून कैजाण इब्राहम या व्यक्तीलासुद्धा अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून यासंदर्भात पाच जणांना अटक केली आहे.