मुंबई - उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी 3 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारात घडली होती. त्यामुळे संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध होत असताना आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही या घटनेच्या निमित्ताने भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी हे कमालीचे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना मानवता आणि गरीबांच्या हक्कांविषयी कळवळा आहे. त्यामुळेच अनेकदा पंतप्रधान मोदी हे जाहीरपणे अश्रू ढाळताना जगाने पाहिले आहे. त्या संवेदनशील मोदी यांनी चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करू नये, याचे आश्चर्य वाटते, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात? -
हिंदुस्थान ज्या चार स्तंभांवर टिकून आहे, ते स्तंभ भय आणि दहशतीच्या वाळवीने पोखरले गेले आहेत. रोजच देशात अशा घटना घडत आहेत व त्यामुळे लोकशाहीबाबतची चिंता वाढू लागते. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलक शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालून त्यांना चिरडून मारण्याचा निर्घृण प्रकार घडला आहे. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमालीचे संवेदनशील तसेच भावनाशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना मानवता आणि गरीबांच्या हक्कांविषयी कळवळा आहे. त्यामुळेच अनेकदा पंतप्रधान मोदी हे जाहीरपणे अश्रू ढाळताना जगाने पाहिले आहे. त्या संवेदनशील मोदी यांनी चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करू नयेत याचे आश्चर्य वाटते. कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली आले तर ते मरणारच, त्याविषयी किती दुःख व्यक्त करायचे? पण योगींच्या राज्यात चार शेतकरी गाडीखाली आले व त्यांना ठार केले गेले. चार शेतकऱ्यांच्या हत्येने आंदोलन पेटले. त्यातून हिंसाचार घडला, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
राज्यातील भाजपा नेत्यांवरही टीका -
पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपानेत्यांवरही या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते मराठवाडा, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर पोहोचले, तेव्हा त्यांना कोणी रोखले नाही, पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले. शेतकऱ्यांना मारायचे व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही? केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने केलेला हा अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपने देश डोक्यावर घेतला असता. आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार, अराजकवादी ठरविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर “जय जवान, जय किसान'चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं!, अशी टीका राज्यातील भाजपा नेत्यांवर करण्यात आली आहे.
हेही वाचा - शाहरुखचा चाहता आला उदयपूरवरून, ड्रग्स प्रकरणावर व्यक्त केली नाराजी