मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अटकेत असलेला सिद्धार्थ पिठानी याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्याला 2 जुलैला सरेंडर व्हावं लागणार आहे. लग्नाचं कारण देत सिद्धार्थ पिठाणीच्या वकिलाने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. यावर कोर्टाने सिद्धार्थला दहा दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
सिद्धार्थ पिठाणीवरील आरोप..
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स प्रकरणाचा तपास एनसीबीकडून सुरू आहे. याप्रकरणी सिद्धार्थने ड्रग्स विकत घेऊन देण्यासाठी सुशांतची मदत केल्याचा आरोप आहे. प्रकरणी एनडीपीएस अधिनियम कलम 27 ए अंतर्गत सिद्धार्थ पिठानीला अटक केलीय. मागच्या वर्षी 14 जूनला सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. या मृत्यू प्रकरणात तपासादरम्यान ड्रग्सचा अँगल समोर आल्यानंतर एनसीबीकडून तपास सुरू करण्यात आला. या संपूर्ण चौकशीदरम्यान बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली होती.