मुंबई - मुंबईमधील चेंबूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान भावाला घरात घेतले नाही म्हणून जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या पोरीला गंभीर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या घटनेची दखल सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली व पोलिसात तक्रार करण्यात आली. या प्रकरणी तिच्या वडिलांना रविवारी रात्रीच पोलीसांनी अटक केली आहे. या मारहाणीत मुलीची आईही सामील आहे.
मुलींच्या वडिलाचे नाव महेंद्र इथापे तर आईचे नाव रूपाली इथापे आहे. वडील बेस्टमध्ये कर्मचारी असून आणिक आगार येथे कामाला आहेत. त्यांच्याविरुद्ध कलम 324 आणि बाल निहाय कलम 75 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा - भयानक.. रशियाच्या पर्म विद्यापीठात अज्ञाताचा अंदाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू
लहान भावास घरात घेतले नाही म्हणून मारहाण -
चेंबूर येथे हे कुटुंब वास्तव्यास आहे. या मुलीच्या लहान भावाने झोपेत लघवी केल्याने आई रागावेल या भीतीने घरातून बाहेर पळून गेला. तिच्या आईने या मुलीला घराची चावी देऊन लहान भावास घरात घेण्यास सांगितले. यानंतर मुलीचे आई, वडील त्यांच्या आईच्या उपचारासाठी केम रुग्णालयात गेले. ते गेल्यानंतर या मारहाण झालेल्या मुलीने पिण्याचे पाणी आल्याने पाणी भरून घरातील साफसफाई केली व त्यानंतर अभ्यासा करण्यास बसली. मुलगी घराबाहेर असणाऱ्या लहान भावास घरात घेण्यात विसरली. तिचे आई-वडील व आजी घरी आल्यानंतर तिचा भाऊ हा घराबाहेर फिरत असल्याचे दिसले. या घटनेनंतर त्यांच्या शेजाऱ्यांनी आई-वडिलांचा खडे बोल सुनावले. याचा राग येऊन वडिलांनी तिला हाताने मारहाण केली व दोनदा उचलून खाली जमिनीवर आपटले. आईने मुलीला हाताने ढकलले. वडिलांनी मुलीला पट्ट्याने मारल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही घटना निंदनीय असून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.