मुंबई - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता त्यांना मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेसोबतच वाय प्लस दर्जाची पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे.
सामंत यांच्यावर पक्षाकडून नुकतेच शिवसेनेच्या पक्ष प्रवक्तेपदाचीही जबाबदारी दिली असून त्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिल्यानंतर त्याची नीट अंमलबजावणी होण्यासाठी सामंत हे सध्या राज्यातील विद्यापीठाचा दौरा करत आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी सामंत अमरावती दौऱ्यावर असताना त्यांना अभाविपच्या एका कार्यकर्त्याने अमरावतीहून नागपूरला जाऊन दाखवा, असा इशारा देत धमकी दिली होती. यामुळेही त्यांच्या सुरक्षेत वाढ केली असल्याचे सांगण्यात येते.