मुंबई - हेरगिरीच्या आरोपांदरम्यान मुंबई पोलिसांनी गुरुवारी एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांची सुरक्षा वाढवली आहे. वानखेडे सध्या क्रूझवर सापडलेल्या अमली पदार्थांच्या तपासावर देखरेख करत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला, वानखेडे यांनी दावा केला होता की, दोन पोलीस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांचा सुरक्षेसाठी आणखी 4 पोलीस तैनात केले आहेत. वानखेडे वापरत असलेल्या वाहनाची जागा त्यांच्या नवीन सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून एक एसयूव्ही देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील एनसीबी कार्यालयाबाहेर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे, अशी माहिती मिळत आहे.
पाळत ठेवत असल्याची समीर वानखेडेंची तक्रार -
मुंबई पोलिसांचे दोन कर्मचारी साध्या वेशात पाठलाग करत असल्याची तक्रार एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी केल्याचे एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते. त्यांनी मुंबई पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे याविषयीची तक्रारही केली होती.
हेही वाचा - हिंदुस्तान बेशरम लोकांचा देश असून निर्लज्जपणातही क्रमांक एकवर - संभाजी भिडे