मुंबई - आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. यासाठी भाजपकडून शिवसेना आणि महायुतीत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, या वाटाघाटीवर शिवसेना नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यासाठी भाजपचे जेष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत. या भेटीत ते भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना आणि भाजप महायुतीतले घटक पक्ष यांच्या जागा वाटपाचा मुद्दा, काँग्रेसमधून भाजपत येणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रीमंडळ विस्तारातल्या समावेश यावर ते शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच इतर पक्षातून भाजपत येणाऱ्या आमदारांचे योग्य पुनर्वसन आणि आगामी विधानसभा तिकिटांच्या बाबतीत ही चर्चा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या धोरणांनानुसार लोकसभा निवडणुकीत काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर विधानसभेतही काही आमदारांना डच्चू देण्यात येणार आहे, यासंदर्भातही पाटील दिल्लीत चर्चा करणार आहेत.