मुंबई - कोरोना-टाळेबंदीमुळे मालमत्ता बाजारपेठेला पुरती अवकळा आली होती. पण आता मात्र सणासुदीच्या काळात मालमत्ता बाजारपेठेला 'अच्छे दिन' आले आहेत. दिवाळीच्या काळात अर्थात नोव्हेंबरमध्ये केवळ 15 दिवसांत राज्यात 77 हजार 104 घरांची विक्री झाली आहे. या घरविक्रीतून मुद्रांक शुल्क रुपाने राज्याला 589 कोटींचा महसूल मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदा लागू केली होती. त्यामुळे 2020 मध्ये सर्वात कमी घरविक्री ही एप्रिलमध्ये झाली. इतिहासातील सर्वात कमी घर विक्री एप्रिलमध्ये झाली. एप्रिलमध्ये राज्यात केवळ 778 घरे विकली गेली. त्यातून राज्याला मुद्रांक शुल्क रुपाने केवळ 3 कोटी 11 लाख इतका महसूल मिळाला. यापूर्वी राज्यात महिन्याला घर विक्रीचे लाखो व्यवहार पूर्ण झाले होते. एक हजारही घरे विकली न गेल्याने मालमत्ता बाजारपेठेत चिंतेचे वातावरण होते.
![घर विक्री](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-7209214-house-sale-diwali-stamp-duty_17112020124708_1711f_1605597428_35.jpeg)
स्थावर मालमत्ता क्षेत्र सावरण्यास सुरुवात-
सप्टेंबर-ऑक्टोबरपासून परिस्थिती हळूहळू सुधारण्यास सुरुवात झाली. तर महत्त्वाचे म्हणजे दसरा-दिवाळीत मालमत्ता बाजारपेठेला निश्चित चांगले दिवस येतील असा दृढ विश्वास बिल्डरांकडून व्यक्त होत होता. अखेर हा विश्वास खरा ठरला आहे. कारण दसऱ्याच्या महिन्यांत अर्थात ऑक्टोबरमध्ये राज्यात तब्बल 1 लाख 30 हजार 955 घरे विकली गेली. यामुळे मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दिवाळीतही घर विक्रीचा धमाका
टाळेबंदीपूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये राज्यात 1 लाख 7 हजार 997 घरांची विक्री झाली होती. त्यातून 1 हजार 519 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कहर असताना फेब्रुवारीपेक्षाही अधिक घरे विकली गेली. सप्टेंबरमध्ये 1 लाख 19 हजार 834 घरे विकली गेली होती. यातून 763 कोटींचा महसूल मिळाला होता. तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा थेट 1 लाख 30 कोटी 995 वर गेला आहे. यातून 931 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर नोव्हेंबरमध्ये तर विक्रमी घर विक्री झाल्याने खऱ्या अर्थाने मालमत्ता बाजारपेठेत दिवाळी साजरी होताना दिसत आहे.
मुंबईतही विक्रमी घर विक्री
दिवाळीच्या मुहूर्तावर बृहन्मुंबई परिक्षेत्रातही 15 दिवसात चांगली घर विक्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 15 दिवसांत 5 हजार 389 घरे विकली गेली आहेत. यातून 157 कोटींचा महसूल मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबईत 7 हजार 929 घरे विकली गेली आहेत. यातून 232 कोटींचा सरकारला महसूल मिळाला आहे. दरम्यान सणासुदीचा काळ या घरविक्रीला कारणीभूत आहे. त्याबरोबर केंद्र सरकारने दिलेल्या विशेष सवलती तसेच राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात केलेली 2 टक्के कपात ही मालमत्ता बाजारपेठेच्या चांगल्या पथ्यावर पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा देशभरातील महानगरांमध्ये घरविक्रीला फटका-
कोरोना महामारी आणि टाळेबंदीचा देशातील घरांच्या विक्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. देशातील सात महानगरांमध्ये पहिल्या सहामाहीत घरांची झालेली विक्री ही गतवर्षीच्या दुसऱ्या सहामाहीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी कमी आहे. अॅनारॉक स्थावर मालमत्ता कंपनीने घराच्या विक्रीबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जानेवारी ते जूनदरम्यान 57 हजार 940 घरांची विक्री झाल्याचे नमूद केले आहे. देशातील सात महानगरांमध्ये घरांची विक्री 46 ते 51 टक्क्यांनी कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गतवर्षी दुसऱ्या सहामाहीत वर्षभरातील घरांच्या विक्रीच्या प्रमाणात 22 टक्के विक्री झाली होती. त्यामुळे यंदा सहामाहीत घरांच्या विक्रीत घसरण झाली, तर त्याचा मोठा फटका वर्षभरातील विक्री व्यवसायावर होणार आहे. कारण दुसऱ्या सहामाहीत घरांच्या विक्रीचे प्रमाण कमी असते.