मुंबई - अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या लालबागच्या राजाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होत आहे. कोरोनाचे संकट आणि दहशतवादी हल्ल्याच्या भीतीमुळे पोलीस आणि शीघ्रकृती दलाच्या बंदोबस्तात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश भक्तांनी मिरवणुकीसाठी मोठी गर्दी करू नये, यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून रस्ते बंदिस्त केले होते. घरांच्या खिडक्या, टेरेसवर, उड्डाण पूलावरून भाविकांनी फुलांचा वर्षाव करत व मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
कोरोनाच्या सावटात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश भक्त बापाला निरोप देत आहेत. राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियमावलीचं पालन करत घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सकाळपासून सुरुवात झाली. दरवषी लालबागच्या रस्त्यावर लालबागचा राजा, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, तेजूकाय, चिंतामणी, रंगारी, बदक चाळीचा गणपती अशा प्रसिद्ध गणपतींची मिरवणूक निघते. येथे लोकांची मोठी गर्दी असते. परंतु यंदा या गर्दीला कोरोनाचे संकट असल्याने गर्दी करु नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते.
हे ही वाचा -नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानशी संबंध; त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला विरोध- अमरिंदर सिंग
लालबागकडे जाणारे रस्ते बॅरिकेट्स लावून बंदिस्त -
मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत लालबाग परिसरातील रस्ते केवळ गणपतीच्या मार्गक्रमणासाठी मोकळे केले. सकाळी १० वाजता गणेश गल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मंडपाच्या मुख्यद्वारावर फटाके, फुलांचा वर्षाव करताच बाप्पा मोरयाचा जयघोष दुमदुमला. दरवर्षी डीजे, ढोलताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक निघते. यंदा शांततेत गिरगावच्या दिशेने गणेशगल्लीचा राजा मार्गस्थ झाला. मात्र दर्शनासाठी पुढे येणाऱ्या भाविकांना पोलिसांनी अडवून नियमांची आठवण करून दिली. गणेश भक्तांनीही पोलिसांना सहकार्य केले. अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात बाप्पाची मिरवणूक अगदी शांततेने पुढे सरकली.
हे ही वाचा -अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री की पुणे-पिंपरीचे; चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल
दुपारी 12 वाजता लालबागचा राजा मार्गस्थ -
दुपारी १२ वाजता लालबाग राजा विसर्जनासाठी मंडपातून बाहेर पडला. भाविकांनी सकाळीच लालबाग परिसरात आरतीसाठी गर्दी केली होती. गुलालांची उधळण, फुलांचा वर्षाव, गणरायाच्या जयघोषाने भाविकांनी लालबाग परिसर दणाणून सोडला. विसर्जन मिरवणुकीला केवळ १० व्यक्तींना परवानगी असल्याने गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांची मोठी कुमक वाढवली होती. संपूर्ण परिसर बॅरिकेट्स लावून बंदिस्त केला होता.