मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात 'मुंबईची झाली तुंबई' 'पालिकेच्या कामाचा पोल-खोल' अशा आशयाच्या बातम्या पाहायला मिळतात. मात्र मुंबईत नेमके कुठे पाणी भरले आहे? हे आपल्याला मोबाइलवर कळणे तसे फार कठीण असते. या सर्वावर उपाय म्हणून आता आयआयटी मुंबईतील विद्यार्थी कामाला लागले आहेत. हे विद्यार्थी ( IIT student Mumbai ) मुंबईकरांना मुंबईत नेमके कुठे पाणी भरले आहे? याची माहिती मोबाइलवर, ट्विटरवर उपलब्ध व्हावी यासाठी एक नकाशा तयार करत आहे. पावसाळ्यात पाणी तुंबणे आणि त्यामुळे होणारी पूरस्थिती ही मुंबईकरांसाठी काही नवी नाही. पण, या संदर्भात मुंबईकरांना माहिती देणारी यंत्रणा अद्याप तरी नाही. त्यामुळे आमची कल्पना हीच आहे, की मुंबईकरांना या संदर्भातील माहिती मोबाइलवर मिळावी. यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आयआयटी मुंबईचे सुबिमल घोष ( Subimal Ghosh ) यांनी दिली आहे.
असा असेल मॅप : आम्ही देखील मुंबईच्याच नागरिकांची मदत घेणार आहोत. थोडक्यात काय तर क्राउड इन्फर्मेशनच्या बेसवर आम्ही ही यंत्रणा तयार करत आहोत. उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडतात तेव्हा तुमच्या भागात किती पाणी आहे ? गुडघाभर पाणी आहे की त्याच्या पेक्षा कमी आहे, की त्याहून जास्त ? हे तुम्हाला तिथला फोटो काढून ट्विटरवरती #mumbai_flood_data या हॅशटॅग ट्विट करायचे आहे. हे सर्व ट्विट आम्हाला मिळतील. या सर्व माहितीची आम्ही शहानिशा करू आणि त्यानंतरच ही माहिती आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचवू. जेणेकरून त्यांना अधिकृत आणि योग्य माहिती मिळेल. मुंबईकर पावसाळ्यात खबरदारी घेऊ शकतील, अशी माहितीही घोष यांनी दिली आहे.
सुरुवातीचे दोन महिने निरीक्षण : या कामाला लगेचच सुरुवात होईल असे नाही. तर सुरुवातीचे दोन महिने म्हणजे जून आणि जुलैमध्ये दिलेल्या हॅशटॅगवर किती ट्विट येतात. किती माहिती मिळते? याचा आढावा घेतल्या जाणार आहे. जर प्रतिसाद चांगला असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील त्याच पद्धतीने काम होणार असल्याची माहिती घोष यांनी दिली आहे. हा सर्व डेटानंतर पुढे पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो. त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही ही सर्व माहिती गोळा केली जाणार आहे. ही माहिती सामान्य माणसाला देखील उपलब्ध असेल व ज्या लोकांना पूरस्थितीवर अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती उपलब्ध असेल, असे माहितीही सुबिमल घोष यांनी दिली आहे.