मुंबई - राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात काल शिथिल केले आहेत. मुंबई महापालिकेने देखील नवीन आदेश जारी केले. मुंबईचा गेल्या दोन आठवड्यातील कमी होणारा संसर्ग दर ही बाब लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र मुंबई लोकल ट्रेनला हिरवा कंदील देण्यात आलेला नाही. यावरून मनसेने शिवसेनेवर टीका केलेली आहे. सर्व जणांच्या पाठीवर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
"शिव पंख" लावून दिलेत तर -
'सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत बसला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे, या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण "शिव पंख" लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी' असे खोचक ट्विट देशपांडे यांनी केले आहे.
मनसेने दिला होता आंदोलनाचा इशारा -
कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी अजूनही निर्बंध कायम आहेत. यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी आणि लाईफलाईन असलेली मुंबई लोकलमध्ये प्रवेशबंदी आहे. यामुळे सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीनं सुरु केली जावी अशी मागणी केली आहे. जर मागणी मान्य झाली नाहीतर माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल असा इशाराही राज यांनी दिला होता. आता पुन्हा एकदा निर्बंध शिथिल झाल्यानंतर रेल्वे प्रवास याला मात्र मान्यता देण्यात आलेली नाही आहे, यामुळे मनसेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय सुरू राहणार -
- सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे. मात्र, वैद्यकीय दुकाने आठवड्यातील सर्व दिवस 24 तास सुरू ठेवू शकतात.
- सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आठवड्याचे सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल.
- जलतरण तलाव आणि निकटचा संपर्क येऊ शकतो असे क्रीडाप्रकार वगळून इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असणार आहे.
- चित्रकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी असेल.