मुंबई - सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात असलेल्या 2 कोटीहून अधिक लोकांच्या पाण्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे. २००३ साली माझ्या वडिलांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरणाची योजना आणली होती. परंतु, तिला पुढे आकार मिळाला नाही. भाजपकडे दूरदृष्टी असल्याने या योजनेला गती मिळेल आणि त्यासाठी मी काम करत राहणार असल्याचे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
माढा लोकसभा मतदार संघात मागील काही दिवसात मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर बरेच वादळ निर्माण झाले आहे. या मतदार संघात माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी भाजपकडून दिली जाईल असे बोलले जात आहे. अशातच माढा मतदारसंघात असलेल्या प्रश्नावर मला काम करायचे आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा पाण्याचा आहे आणि तोच मला सोडवायचा असल्याचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
कृष्णेतून वाहत जाणारे पाणी हे समुद्राला जाऊन मिळते. तेच पाणी मला उजनी धरणात आणायचे आहे. या धरणातून हे पाणी मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्याला मिळणार आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण या एकाच प्रकल्पातून ६ जिल्हे आणि ३१ तालुक्यांतील १२ लाख एकर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. २००३ साली या प्रकल्पाची किंमत ५ हजार कोटी रुपये होती. आता ती २० हजार कोटी रुपयांच्या दरम्यान पोहोचली आहे. परंतु, या प्रकल्पासाठी लागणारी इतकी मोठी रक्कम सुद्धा सरकारला खर्च करण्याची गरज नाही.
सरकारच्या एका संस्थेने उजनी धरणाचा सर्वे करून या उजनीच्या पोटात ५० हजार कोटी रुपयांची वाळू असल्याचा अहवाल सरकारला दिला आहे. यामधून कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या या प्रकल्पाला मोठा निधी मिळणार आहे. यातून पैसे उभे राहिले तर ६ जिल्ह्यातील ३१ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटणार आहे. सांगली, सातारा, जिल्हा असो अथवा माण, खटाव बारामतीचा काही भाग अथवा इंदापूर, दौंड, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याचा प्रश्न असो. तो या एकाच योजनेतून सुटणार आहे. या योजनेत खरे तर कसलेही राजकारण नाही. फक्त ही योजना जर झाली तर शेतकऱ्यांना आपल्या पाण्याची हमी मिळेल आणि पाणी मिळत नाही म्हणून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थलांतर करावे लागणार नाही, असेही रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. भाजपात आम्ही कोणतीही अट ठेऊन प्रवेश केला नाही, मात्र पक्षाकडून जे काही काम मिळेल ती जबाबदारी पार पाडेन असे ते म्हणाले.