मुंबई - देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणात येत्या काळात पुन्हा एकदा कडक निर्बंधांसह टाळेबंदीसारखीच स्थिती राज्यात आजपासून आहे. याच भीतीने दुसर्या राज्यातून आलेल्या स्थलांतरित मजुरांनी पुन्हा एकदा आपल्या घराची वाट धरली आहे. टाळेबंदीची घोषणा होऊन पुन्हा एकदा वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल, या भीतीने मजूर पुन्हा गावी परतत आहेत. आज कुर्ला एलटीटी स्थानकाबाहेर प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती, आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर दिसून आले.
दुसऱ्या राज्यातील मजूरांना पुन्हा एकदा त्यांच्या गावी जाण्यासाठी एलटीटी स्थानकातून काही महत्त्वाच्या गाड्या सुटतात मात्र टाळेबंदीच्या पाश्वभूमीवर गावी परतणाऱ्या मजुरांसाठी एलटीटी स्थानकातून काही विशेष रेल्वे रवाना होणार आहेत. मंगळवारी कुर्ला येथे स्थानकातून एकूण 23 रेल्वे रवाना झालेल्या या रेल्वेमधून मुंबईत काम करणारे स्थलांतरित मजूर आणि कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आहे.
कुर्ला स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी
दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. त्यामुळे उन्हाळ्यात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, मात्र आज या रेल्वेमध्ये नेहमीप्रमाणापेक्षा जास्त गर्दी पाहायला मिळाली, अचानक ही गर्दी वाढली असल्याचे मध्य रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. कुर्ला स्थानका बाहेर प्रवाशांनी केलेल्या गर्दीमुळे सुरक्षित अंतराचे सर्व नियम मोडले गेले. यानंतर अशा प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना केलेल्या आहेत, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी बोलताना सांगितले.
मजूर वेळीच आपल्या घराची वाट धरत आहेत
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात स्थलांतरित मजुरांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होते. त्यांच्या राहण्याचा आणि जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, म्हणून कामासाठी मुंबईत स्थलांतरित मजूर वेळीच आपल्या घराची वाट धरत आहेत. तसेच गेल्या टाळेबंदीमध्ये या मजुरांना रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागलेला होता. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मध्य रेल्वेने या टाळेबंदीच्या काळात विशेष काळजी घेत रेल्वेच्या उपाययोजना या सुधारित केलेल्या आहेत, अशी माहिती सुतार यांनी दिलेली आहे.