मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या वतीने जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध तबला वादक पद्म भूषण उस्ताद झाकीर हुसेन ( Padma Bhushan Zakir Hussain LLD Degree ) यांना डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी), प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे ( Entrepreneur Shashikant Garware honorary degree ) यांना डॉक्टर ऑफ लीटरेचर (डिलिट) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ही मानद पदवी १२ मे २०२२ रोजी विशेष दीक्षान्त समारंभामध्ये राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाने मानद पदवी प्रदान करण्यासाठी विशेष दीक्षान्त समारंभ १२ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या फोर्ट येथे सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने यावर्षी जागतिक किर्तीचे तबला वादक पद्म भूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) ही मानद पदवी तसेच गरवारे उदयोजक समूहाचे प्रमुख शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लीटरेचर (डिलिट) त्यांच्या कार्यातील योगदानाबद्दल ही मानद पदवी देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या प्राधिकरणाने घेतला. यानुसार ही मानद पदवी देण्यात येत आहे. यापूर्वी विद्यापीठाने प्रसिद्ध कृषीतज्ञ स्वामिनाथन यांना डिलिट ही मानद पदवी देण्यात आली होती. विशेष दीक्षान्त समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
हेही वाचा - Mother Bear Video : भर उन्हात पिलांना पाठीवर घेऊन 'ती' निघाली पाण्याच्या शोधात