मुंबई- कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाला. जनता घरात बसलीय. मात्र, ज्यांचे घरच नाही, अशा शहरातील दोन लाख आणि उर्वरित महानगरातील साडेतीन लाख लोकांची अवस्था बिकट झाली आहे. शहरातील लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे गेले चार दिवस रस्त्यावर राहणारे लोक आंघोळ देखील करू शकले नाहीत. सार्वजनिक स्वच्छतागृह बंद असल्यामुळे त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून या साडेपाच लाख लोकांना कोरनाचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण शहर कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेल्टर मॉनिटरिंग कमिटीचे सदस्य ब्रिजेश मौर्या यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना मुंबईत जवळपास दोन लाख बेघर मजूर असल्याची माहिती दिली. हातावर पोट असल्याने सध्या त्यांचा संपूर्ण रोजगार बंद झालाय. बाहेरचे सर्व छोटी-मोठी कामे देखील बंद आहेत. गेल्या चार दिवसांपासून हे लोक घरीच बसून आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईमध्ये ऑन रेकॉर्ड ५७ हजार ४१५ बेघर आहेत. यातील काही टक्का दुष्काळी भागातला असून सत्तर टक्के लोक मराठी आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, भाईंदर अशा शहरांतील कामगार नाक्यांवरील मजुरांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा आकडा सहा लाखांवर असल्याचे त्यांनी सांगितले. संचारबंदीमुळे या मजुरांची आता उपासमार सुरू झालीय. सरकारने अशा परिस्थितीत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना मदत करावी. तसेच या लोकांना तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मॉनिटरिंग कमिटीचे सदस्य ब्रिजेश मौर्य यांनी केली आहे.