मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणासाठी कायदा करावा, अशी लेखी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली. तसेच, या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या दालनात, त्यांची भेट घेऊन खासदार शेवाळे यांनी हे निवेदन सादर केले.
हेही वाचा - आशा स्वयंसेविका अन् आरोग्यमंत्री यांची बैठक निष्फळ, आंदोलन सुरू ठेवण्यावर कृती समितीचा ठाम
चर्चा झाल्यास तोडगा निघेल
शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठा समाजाने आरक्षण मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोठा संघर्ष केला आहे. राज्य सरकारने देऊ केलेले आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यावर पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, लोकसभेत याविषयी सविस्तर चर्चा झाल्यास त्यातून तोडगा निघू शकेल आणि मराठा आरक्षणासाठी कायदा करणे सुकर होईल. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या भावनांचा आदर करत आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन आयोजित करावे.
हेही वाचा - कोरोना लसीकरण मोहिमेसाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळेंकडून एका महिन्याचे वेतन