मुंबई : वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 प्रकल्पाच्या कामासाठी 357 तिवरांची कत्तल करण्यास अखेर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्यामुळे आता मेट्रो 4 प्रकल्पातील भक्ती पार्क मेट्रो स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई आणि ठाण्याला मेट्रोशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो 4 प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मेट्रो 4 मधील एक स्थानक वडाळा भक्ती पार्क येथे बांधण्यात येणार आहे. मात्र, या कामासाठी 357 तीवरे कापावी लागणार आहेत. त्याप्रमाणे एमएमआरडीएने परवानगी मागितली होती. त्यानुसार उच्च न्यायालयात आज यावर सुनावणी पार पडली.
यावेळी न्यायालयाने सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने मेट्रो 4 प्रकल्प महत्त्वाचा आहे, असे म्हणत तिवरांची कत्तल करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता भक्ती पार्क मेट्रो स्थानकाचे काम सुरू करणे एमएमआरडीएला शक्य होणार आहे. तिवरे कापून या जागेवर 48 खांब उभारण्यात येणार आहेत. तर एक रस्ताही येथे बांधण्यात येणार आहे.
दरम्यान, या 357 तिवरांची कत्तल केल्याच्या मोबदल्यात एमएमआरडीएला तिवरे लावावी लागणार आहेत. जवळपास 4,444 तिवरे 1 हेक्टर जागेवर लावावी लागणार आहेत.
याविषयी एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही दिलासादायक बाब असल्याचे म्हणत आता लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करत मेट्रो 4 चे काम पुढे नेऊ असे म्हटले आहे.