मुंबई- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 व 35 (अ) हटविल्यानंतर गृह खात्याकडून गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबईतील विविध परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे.
काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वतः शोपिया जिल्ह्यात परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेकडून भारतातील महत्वाच्या शहरात घातपाती कारवाया केल्या जाऊ शकतात.
जम्मू-काश्मीर, दिल्ली व देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या प्रमाणावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून मुंबईतील विविध परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही ठिकाणी रात्री उशिरा कोंबिंग ऑपरेशन सुद्धा हाती घेण्यात आले आहे.