मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणात अपहार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्राला पोलिसांनी समन्स बजावला. त्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर आज सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला आहे. न्यायालय सायंकाळपर्यंत यावर फैसला सुनावण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
काय आहे आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरण - 2014 मध्ये सेव्ह आयएनएस विक्रांत ही मोहीम भाजपनेते किरीट सोमय्या यांनी सुरू केली होती. या मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. ते पैसे राजभवनाला देणार असल्याचे सांगूनही ते 57 ते 58 कोटी रुपये राजभवनाला दिलेच नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. हा मोठा देशद्रोह असून याची केंद्रीय तपास यंत्रणांनी कसून चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्र सरकारने यावर कडक करावाई करावी असेही राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या मागणीनंतर मुंबई पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर सोमय्यांविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकारणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि सुपुत्र निल सोमय्या यांना समन्स बजावण्यात आला. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आज त्यावर सुनावणी होणार आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊतांचे गंभीर आरोप - 2014 साली मुंबईत किरीट सोमय्यांच्या माणसांनी लाखो करोडो रुपये गोळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. सेव्ह विक्रांत मोहीम सुरू करुन करोडो रुपये कमावले. INS सेव्ह विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांच्या माणसांनी टि शर्ट घालत पैसे जमविले. 57 ते 58 कोटी रुपये सोमय्यांनी जमविले. हे पैसे सरकारला देण्याचे सोमय्यांनी म्हटले होते. पण हे पैसे मिळाले नाहीत. ही माहिती सरकारनेचे दिली आहे. पैसे जमा केल्याचे माझ्याकडे फोटो आहेत. लोकांनी मला सांगितले की आम्ही 5-5 हजार रुपये दिले आहेत. ही रक्कम जर राजभवनात गेली नसेल, तर कुठे गेली असा सवालही संजय राऊत यांनी केला? हे पैसे भाजपाने निवडणुकीत वापरले का? हा देशद्रोह आहे, याची केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.